
वाट कशाला बघू कुणाची.............
वाट कशाला बघू कुणाची, झुरण्यासाठी जन्म आपुला
अवती भवती असून तुझिया, नसण्यासाठी जन्म आपुला
सुकून गेल्यावरी कळाले, उगाच कट्यापरी रहातो...
मला कदापी कळले नाही, फुलण्यासाठी जन्म आपुला
कितीक आले, कितीक गेले, मला न आता याद कुणाची ...
आठवणींची पाटी नुसती, पुसण्यासाठी जन्म आपुला
दुःखाचीही नशा करावी, पराभावाने झिंग चाढावी
अश्रूंचाही रिचवुन प्याला, झुलण्यासाठी जन्म आपुला
दुर्दैवाच्या लगाम हाती, किती क्रूर हा जुना सारथी
ऊर फुटे तो पळण्यासाठी, थकण्यासाठी जन्म आपुला
वादळ गेल्यावरी जराशी.... झुळूक आली तुझी परंतू ....
पाचोळा मी भिरभिरणारा, उडण्यासाठी जन्म आपुला
कळी म्हणाली निर्माल्याला, ऱडू नको तू उगीच आता
ऐन ऋतूच्या मध्यावरती, गळण्यासाठी जन्म आपुला
ज्योत दिव्याची जळणारी तू, तुझा दिवाणा पतंग मीही
जळण्याच्या ह्या दोन तऱ्हा पण, विझण्यासाठी जन्म आपुला


0 Comments:
Post a Comment
<< Home